युवारंग २०२५ : जी. एच. रायसोनी महाविद्यालयात कलाविष्कारांची झलक रंगणार!


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवारंग २०२५’ या आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ८ ते १२ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. यंदा रौप्य महोत्सवाच्या स्वरूपात साजरा होणारा हा कार्यक्रम २१ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला साजेसा ठरणार असून देशभरातील ११४ महाविद्यालयांतील सुमारे १८०० विद्यार्थी विविध २७ कलाप्रकारांत आपली कला सादर करणार आहेत.

महोत्सवाच्या पूर्वतयारी संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, समन्वयक डॉ. संजय शेखावत, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाडे आणि कार्याध्यक्ष नितीन झाल्टे यांनी महोत्सवाचे स्वरूप, व्यवस्थापन आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यंदाच्या ‘युवारंग’ची संकल्पना ‘वंदे मातरम् १५०’ असून या पार्श्वभूमीवर प्रत्येक रंगमंचाला राष्ट्रनायकोंची व समाजसुधारकांची नावे देण्यात आली आहेत. बंकिमचंद्र चटोपाध्याय, स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी प्रदीप, प्रेम धवन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावांनी रंगमंच सजले असून, प्रत्येक ठिकाणी युवकांचे सृजनशील सादरीकरण होणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भव्य समारंभात होणार असून यासाठी विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. महोत्सवात ८ ऑक्टोबर रोजी नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता ‘आनंदमठ’ या भव्य मराठी संगीत नाटकाचे सादरीकरण बंकिमचंद्र चटोपाध्याय सभागृहात होणार आहे. विनिता तेलंग लिखित आणि स्वीट सातपुते दिग्दर्शित हे नाटक सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीवर आधारित असून त्याला राज्यस्तरीय नाट्यस्पर्धांत गौरवही मिळाला आहे.

९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान रोज सकाळी ८ वाजल्यापासून २७ कलाप्रकारांत स्पर्धा रंगणार आहेत. यात भारतीय शास्त्रीय नृत्य, नाट्यसंगीत, लोकसंगीत, एकांकिका, वादविवाद, वक्तृत्व, पोस्टर मेकिंग, स्थळचित्र, मूकनाट्य, गाणे, इन्स्टॉलेशन, मेहंदी अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच ‘एकांकिका स्पर्धा’ युवारंगमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यासाठी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसांसह स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे ₹७,००१, ₹५,००१, ₹३,००१ व उत्तेजनार्थ ₹२,००४ रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

महोत्सवासाठी २५ समित्यांची रचना करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व वाहन व्यवस्था महाविद्यालयाच्या आवारात सुयोग्यपणे करण्यात आली आहे. सहभागी विद्यार्थ्यांची आकडेवारीही लक्षणीय असून ५०७ विद्यार्थी, ८०९ विद्यार्थिनी, तसेच विविध व्यवस्थापक व समन्वयक अशा एकूण १८०० जणांनी सहभाग नोंदवला आहे.

महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता रंगमंच क्रमांक १ वर पार पडणार असून या समारंभाला केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर यांची उपस्थितीही विशेष आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक सादरीकरण व राष्ट्रगीताने होणार आहे.

हा महोत्सव म्हणजे केवळ स्पर्धेचे व्यासपीठ नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या सृजनशीलतेला अभिव्यक्त करण्याची, आत्मविश्वास बळकट करण्याची आणि संस्कृती व राष्ट्रप्रेमाशी नाते घट्ट करण्याची संधी आहे. जी. एच. रायसोनी महाविद्यालयासाठी हा रौप्य महोत्सव ही अभिमानाची बाब असल्याचे संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.