सोनभद्र (वृत्तसंस्था) सोनभद्र जिल्ह्यातील हत्याकांडातील पीडितांच्या भेटीला जात असतांना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रियंका यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत पीडितांना भेटल्याशिवाय परत जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्या चुनार रेस्ट हाऊसवर रात्रभर पासून थांबून आहेत. दरम्यान, प्रशासनाने रेस्ट हाऊसचे पाणी, विद्युत पुरवठा खंडित केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
या संदर्भ अधिक असे की, प्रियांका गांधी या शुक्रवारी सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यासाठी जात होत्या. परंतू पोलिसांनी नारायणपूर पोलीस ठाण्याजवळ त्यांचा वाहनताफा अडवत त्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली. याविरोधात प्रियांकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. थोड्यावेळाने प्रियांकांची सुटका करण्यात आली. परंतू आम्हाला केवळ पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. माझ्यासोबत फक्त चार जण असतील. त्यामुळे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही,असेही प्रियंका यांनी स्पष्ट केले होते.
सोनभद्र हत्याकांडातील पीडितांच्या भेटीवर प्रियंका ठाम असून रात्रभर चुनार रेस्ट हाऊसवर जागून आहेत. मध्यरात्री २ वाजेपर्यंत पोलिसांनी प्रियंका यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतू मी मागे हटणार नाही, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे प्रशासनाने मुद्दाम रेस्ट हाऊसचा लाईट व पाणी पुरवठा रात्रीपासून खंडित करून केला असल्याचा आरोप कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, प्रियंका गांधी या परत जातात की, पीडितांची भेट घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.