मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात वाघाचा वाढता वावर आता गंभीर चिंता बनू लागला आहे. कोथळी आणि मानेगाव शिवारानंतर आता हरताळा शिवारात प्रत्यक्ष कॅमेऱ्यात वाघाचे दर्शन झाले आहे. परिणामी, या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन व वन विभाग सतर्क झाले आहेत.

सदर घटना बावनटाकी परिसरात घडली असून, शेतजमिनीवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये वाघाचे स्पष्टपणे दर्शन झाले. काही दिवसांपूर्वी कोथळी आणि मानेगाव भागात वाघाचे पावलांचे ठसे आढळून आले होते, त्यानंतर हरताळा परिसरात कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

या प्रकरणानंतर वन विभागाने तातडीने कारवाई करत परिसरात गस्त वाढवली असून, ग्रामस्थांना विविध सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाणे टाळावे, शेतामध्ये योग्य प्रकाशव्यवस्था करावी, पशुधन सुरक्षित जागी ठेवावे, तसेच कोणतीही हालचाल किंवा संशयास्पद गोष्ट आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना दिल्या आहेत.
हरताळा गावाचे पोलीस पाटील आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांशी संवाद साधत योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच वन विभागाने वाघाचा वावर नेमका कुठून आणि कसा सुरू झाला याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परिसरात जंगलजवळील गावांमध्ये अशा घटना वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
वाघाच्या सतत वाढत्या हालचालींमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. शेतात काम करणारे शेतकरी विशेषतः रात्रीच्या वेळी फार काळजी घेत आहेत. काहींनी तर रात्री शेतावर जाणे थांबवले असून दिवसा देखील गटाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.



