भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गाडी क्रमांक १२५३३ लखनऊ – मुंबई पुष्पक एक्सप्रेसच्या ब्रेक सिस्टीममध्ये आलेल्या बिघाडामुळे काही काळासाठी धावत्या गाडीच्या स्लीपर कोचमधून धूर निघाल्याची घटना आज घडली. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळेवर दाखवलेल्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि संभाव्य दुर्घटना टळली.

पुष्पक एक्सप्रेस दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी नियोजित वेळेनुसार भुसावळ रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने निघाली होती. ही गाडी भुसावळ ते भादली दरम्यान असताना एस-४ क्रमांकाच्या स्लीपर कोचच्या चाकांच्या जवळील ब्रेक सिस्टीममध्ये घर्षणामुळे अचानक धूर निघत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.

सदर परिस्थिती ओळखून गाडी तात्काळ थांबवण्यात आली. ट्रेन मॅनेजर व रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावपळ न करता शिस्तबद्ध पद्धतीने अग्निशमन यंत्रांचा वापर केला व संभाव्य धोका नियंत्रणात आणला. प्राथमिक तपासणीनुसार ही घटना ब्रेक सिस्टीममधील घर्षणामुळे घडली असून आग लागलेली नव्हती, तसेच कोणताही स्फोट अथवा यंत्रणा निकामी झाल्याचे निदर्शनास आले नाही.
प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही वा कोणतीही गैरसोय निर्माण झालेली नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सुरक्षा उपायांची पूर्ण खात्री झाल्यानंतरच गाडी पुढील प्रवासासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आली.
या घटनेमुळे काही प्रवाशांमध्ये क्षणिक भीती निर्माण झाली होती, मात्र कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. दरम्यान, काही अपुरी आणि भ्रामक माहिती समाजमाध्यमांवर पसरत असल्याचे लक्षात आल्याने रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळ, हेल्पलाइन किंवा सूचनांद्वारेच घ्यावी.
रेल्वे प्रशासनाने या प्रकारातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते आणि अशा तांत्रिक अडचणींना तातडीने हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेहमी सज्ज असतात.



