जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३० सप्टेंबर रोजी कांताई सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत शहरी व ग्रामीण विभागांतील एकूण १९ संघांनी सहभाग घेतला. देशभक्तीच्या ओजस्वी गीतांनी सभागृहातील वातावरण भारून टाकले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. परीक्षक म्हणून विशाखा देशमुख, वृषाली जोशी यांनी सहभाग घेतला. प्रारंभी बोलताना विशाखा देशमुख म्हणाल्या की, “संगीत हे माणसाला आत्मिक आनंद देणारे माध्यम आहे. सामूहिकतेच्या ताकदीने सादर होणारे समूह गीत एक वेगळी ऊर्जा निर्माण करते.” त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थित कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

प्रत्येक सहभागी संघाने देशभक्तीपर गीते सादर करत गांधीजींच्या विचारांचे सुरेल दर्शन घडवले. सादरीकरणामध्ये अहिंसा, सत्य, स्वदेशी आणि राष्ट्रप्रेम यांसारख्या मूल्यांचा ठसा स्पष्टपणे जाणवत होता. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या सादरीकरणांना उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश कुळकर्णी यांनी तर संयोजन आणि व्यवस्थापनात सुधीर पाटील, अशोक चौधरी, चंद्रशेखर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी व विक्रम अस्वार यांचा मोलाचा सहभाग होता. स्पर्धेत सहभागी सर्व संघांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेतील विजेत्यांना २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता महात्मा गांधी उद्यानात होणाऱ्या गांधी जयंती कार्यक्रमात पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.



