Home क्रीडा जैन चषक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला उद्यापासून सुरुवात 

जैन चषक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला उद्यापासून सुरुवात 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगावकर टेबल टेनिसप्रेमींना येत्या तीन दिवसांत चुरशीच्या सामने पाहायला मिळणार आहेत. जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित जैन चषक राज्य मानांकन प्रौढ टेबल टेनिस स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून मु. जे. महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुल इंडोअर हॉलमध्ये मोठ्या उत्साहात सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, राज्यातील नामवंत खेळाडूंना आपल्या खेळाचे प्रदर्शन करायला हे व्यासपीठ मिळणार आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रौढ गटाच्या पुरुष व महिला विभागांमध्ये वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारात सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्यातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, जे या स्पर्धेत आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकूण ३०० ते ४०० खेळाडूंचा सहभाग अपेक्षित असून, स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. यावेळी स्पर्धेला जैन इरिगेशन लिमिटेडचे प्रायोजकत्व लाभले असून, क्रीडा क्षेत्रातील स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन ही जळगावसाठी गौरवाची बाब मानली जात आहे. प्रेक्षकांसाठी देखील या सामन्यांमध्ये विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला असून, टेबल टेनिसप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound