Home आरोग्य जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जनजागृतीचे उपक्रम

जागतिक हृदय दिनानिमित्त गोदावरी नर्सिंगमध्ये जनजागृतीचे उपक्रम

0
183

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगावमधील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे जागतिक हृदय दिन २०२५ निम्मित विविध जनजागृतीमूलक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. “Don’t Miss a Beat” या वर्षीच्या जागतिक थीमनुसार वैद्यकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करून हृदयारोगाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली.

या कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मेडिकल-सर्जिकल नर्सिंग विभागातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात जनजागृती रॅलीने झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी हृदयाच्या आरोग्यावर भाष्य करणारे फलक, घोषवाक्य आणि संदेश घेऊन सहभाग घेतला. त्यानंतर प्रातिनिधिक नाटिकेच्या माध्यमातून अस्वस्थ जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तणाव, जंक फूडचे सेवन यामुळे होणाऱ्या हृदयविकारांचे वास्तव अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आले.

कार्यक्रमातील सर्वाधिक लक्षवेधी उपक्रम म्हणजे बेसिक सीपीआर (कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन) चे प्रात्यक्षिक. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मॉडेल्सवर सीपीआर कसे करावे याचे मार्गदर्शन केले. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांपुरता न राहता, कार्यक्रमात सहभागी असलेल्या नागरिकांनीही प्रत्यक्ष सहभागी होऊन अनुभव घेतला.

या संपूर्ण उपक्रमातून हृदयविकाराचे लवकर निदान, जीवनशैलीतील बदलांचे महत्त्व, तसेच आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिक्रिया देण्याचे महत्व समाजासमोर प्रभावीपणे मांडले गेले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षक व विभागप्रमुखांचे मार्गदर्शन तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे दिवस अधिक अर्थपूर्ण ठरला.

गोदावरी नर्सिंग कॉलेजने केलेल्या या सामाजिक भान असलेल्या उपक्रमांमुळे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढले असून, समाजालाही आरोग्यदृष्टीने सजग राहण्याचा संदेश मिळाला आहे.


Protected Content

Play sound