Home उद्योग अशोक जैन यांचा महावीर सहकारी बँकेतर्फे गौरव

अशोक जैन यांचा महावीर सहकारी बँकेतर्फे गौरव

0
177

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  श्री महावीर सहकारी बँक लि., जळगावची २७ वी सर्वसाधारण सभा रोटरी भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेचा विशेष आकर्षण ठरला तो म्हणजे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांचा विशेष सन्मान. जागतिक स्तरावर “विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अ‍ॅवार्ड” मिळवणाऱ्या अशोक जैन यांचा बँकेच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, बँकेचे चेअरमन दलिचंद जैन, माजी संचालक राजेंद्र मयूर, व्हा. चेअरमन जयवंतराव देशमुख, संचालक सुभाष लोढा, अशोककुमार खिवसरा, जितेंद्र कोठारी, अजय राखेचा, शांतीलाल बिनायक्या आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंचावर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर पाटील, कर्मचारी प्रतिनिधी बिना मल्हारा यांचाही सहभाग होता.

सभेतील १३ विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मागील सभेचे इतिवृत्त, आर्थिक वर्ष २०२४-२५ चा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, वैधानिक लेखापरिक्षकांची नेमणूक आणि तडजोड कर्जखात्यांची नोंद यांसारख्या मुद्यांचा समावेश होता. सभासदांच्या सहभागाने हे सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कन्याजन्मोत्सव योजनेतील निधी दुप्पट करण्याची घोषणा बँकेचे चेअरमन दलिचंद जैन यांनी केली.

बँकेच्या विकास अधिकारी के. सी. बाविस्कर यांनी सभासदांचे प्रशिक्षण घेतले आणि कर्ज, ठेव, शेअर्स याबाबत जबाबदारी व कर्तव्यांची जाणीव करून दिली. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या स्थापनेमागील इतिहास व ध्येय स्पष्ट करत, अशोक जैन यांचे सामाजिक कार्य आणि शेतकऱ्यांसाठीचे योगदान अधोरेखित केले.

सभेदरम्यान इयत्ता १०वी, १२वी आणि पदवी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. रोशनी नन्नवरे, कुशल जैन, रोहनी पाटील, कृणाल जैन, महिमा जैन, मृदूला पाटील यांसह अनेक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. अजय राखेचा यांनी मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन केले. सुभाष लोढा यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.


Protected Content

Play sound