Home क्रीडा खडसे महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड  

खडसे महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड  

0
199

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगरच्या चार विद्यार्थिनींनी आपल्या कुस्तीतील कौशल्याने महाविद्यालयाचं नाव उज्वल केलं असून, त्यांची थेट आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जळगाव विभाग क्रीडा समितीच्या अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा ए. आर. बी. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथे गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर २०२५) पार पडल्या. या स्पर्धांमध्ये खडसे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी करत निवड सुनिश्चित केली.

निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये कु. पाटील काजल (टी. वाय. बी.ए.) हिने ६२ कि.ग्रॅम वजन गटात, पाटील वैष्णवी (एस. वाय. बी.ए.) हिने ६८ कि.ग्रॅम वजन गटात, सोनी भाग्यश्री (टी. वाय. बी.ए.) हिने ७२ कि. ग्रॅम वजन गटात आणि पाटील योगीता (टी. वाय. बी.एस्सी.) हिने ७६ कि. ग्रॅम वजन गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातून आंतरविभागीय स्पर्धेसाठी आपलं स्थान पक्कं केलं आहे.

या विद्यार्थिनींचे पुढील आव्हान एस. एस. व्ही. पी. एस. कॉलेज, धुळे येथे २८ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धांमध्ये असेल. ही स्पर्धा सिटी इनडोअर हॉल, वाडीभाकर रोड, मुख्य स्टेडियममध्ये संपन्न होणार आहे. त्यासाठी निवड झालेल्या खेळाडू शुक्रवारी स्पर्धास्थळी रवाना होणार आहेत.

या यशस्वी निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. डॉ. एच. ए. महाजन यांनी विद्यार्थिनींचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल बढे यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, डॉ. वंदना चौधरी, क्रीडा समिती सदस्य प्रा. संजय पाटील, प्रा. अभिषेक पाटील, प्रा. डॉ. संतोष थोरात तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या विद्यार्थिनींच्या मेहनतीला यश मिळाल्यामुळे संपूर्ण मुक्ताईनगर परिसरात आनंदाचे वातावरण असून, महाविद्यालयातही विद्यार्थिनींचे यश साजरे करण्यात आले. त्यांच्या पुढील यशासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound