मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रवाशांसाठी एक आनंददायक बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातून जाणाऱ्या तिसऱ्या ‘अमृत भारत एक्सप्रेस’ ट्रेनची घोषणा केली असून, उधना (सुरत) ते ब्रम्हपूर (ओडिशा) या नव्या मार्गावर ही सुपरफास्ट, नॉन-एसी सेवा सुरु करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 27 सप्टेंबर रोजी या ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. ही ट्रेन विशेषतः सामान्य व मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी परवडणारी आणि आरामदायक ठरणार आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर माहिती देत सांगितले की, ही नवी अमृत भारत ट्रेन स्थलांतरित मजूर, गरीब व मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल. उधना ते ब्रम्हपूर दरम्यान ही ट्रेन अनेक प्रमुख स्थानकांवर थांबणार असून, याचा थेट लाभ महाराष्ट्रातील प्रवाशांना होणार आहे.

नव्या अमृत भारत ट्रेनला महाराष्ट्रातील नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शन, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देश भागातील प्रवाशांसाठी ही ट्रेन प्रवासाचा एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.
या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एकूण 22 डबे असणार असून त्यात 11 सामान्य श्रेणीचे, 8 स्लीपर, 1 पेंट्री कार, 2 द्वितीय श्रेणीचे डबे, आणि अपंग प्रवाशांसाठी राखीव 1 डबा असणार आहे. तिचा गतीमान वेग सुमारे 160 ते 180 किमी प्रतितास असेल, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात वेळेची मोठी बचत होणार आहे.
या ट्रेनचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. दर रविवारी सकाळी 07:10 वाजता उधना (सुरत) येथून सुटणारी ही ट्रेन दर सोमवारी दुपारी 13:55 वाजता ब्रम्हपूर (ओडिशा) येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात सोमवारी रात्री 23:45 वाजता ब्रम्हपूर येथून सुटून, बुधवारी सकाळी 08:45 वाजता उधना येथे पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यातून एकदाच धावेल.
भारतीय रेल्वेने ‘अमृत भारत एक्सप्रेस’च्या माध्यमातून देशभरात स्वस्त, गतीशील आणि सुरक्षित प्रवासाचा नवा अध्याय सुरु केला आहे. याआधी महाराष्ट्रातून लोकमान्य टिळक टर्मिनस–सहरसा आणि जोगबनी–ईरोड या दोन अमृत भारत ट्रेन सुरू झाल्या होत्या. आता उधना–ब्रम्हपूर ही तिसरी ट्रेन महाराष्ट्रातून धावणार आहे, ज्यामुळे राज्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे.



