मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरूच असून पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांच्या अस्वस्थतेस कारणीभूत ठरत आहे. काल पुन्हा एकदा भरदिवसा दुचाकी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत होणाऱ्या या चोरीच्या घटना पाहता पोलीस यंत्रणा अपुरी व निष्क्रीय ठरत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

शुक्रवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता श्रीकृष्ण डेअरीसमोरून दिनकर मधुकर निकम (रा. मुक्ताईनगर) यांच्या मालकीची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्रमांक MH.19.AJ.6076) अज्ञात चोरट्याने लांबवली. त्यांचा मुलगा सोनू निकम डेअरीवर दूध व पेढे घेण्यासाठी गेला असता, तेवढ्याच वेळेत लक्ष विचलित करून चोरट्याने दुचाकी पळवली. चोरीचा प्रकार इतक्या सहजतेने घडल्याने परिसरातील व्यापाऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, संबंधित आरोपी हा बोदवड रोडच्या दिशेने जात असल्याचे आढळले. मात्र, अजूनही चोराचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांनी या घटनेनंतर पोलिसांच्या हलगर्जीवर नाराजी व्यक्त करत, शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुक्ताईनगरमध्ये दुचाकी चोरी, मोबाईल चोरी व इतर लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. यामुळे आता जनतेचा संयम सुटू लागला आहे. “पोलिसांनी तत्काळ आरोपीला जेरबंद करून अशा घटना रोखण्यासाठी गस्त व गुप्त तपास यंत्रणा सक्रिय करावी, अन्यथा जनक्षोभ उफाळून येईल,” असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून नागरिकांना काही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात वाहन नेहमी सुरक्षित ठिकाणी लावावे, लॉक लावण्याची सवय ठेवावी, शक्यतो सीसीटीव्हीचा वापर करावा आणि संशयित हालचाली दिसल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



