Home Cities यावल गटारीवर ढापा टाकल्याने वाहतुक सुरळीत ; उमेश फेगडे यांच्या पाठपुराव्याला यश 

गटारीवर ढापा टाकल्याने वाहतुक सुरळीत ; उमेश फेगडे यांच्या पाठपुराव्याला यश 

0
162

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  यावल शहरातील विस्तारित वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावरील गंभीर खड्ड्यांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर नगर परिषद प्रशासनाने गटारीवर ठोस पावले उचलत मोठा ढापा टाकल्यामुळे मार्ग मोकळा झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या कार्यासाठी पाठपुरावा करणारे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष आणि माजी नगरसेवक उमेश फेगडे यांचे व ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे नागरिकांनी विशेष आभार मानले आहेत.

नगर परिषद कार्यक्षेत्रातील वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर मागील सात ते आठ महिन्यांपासून मोठमोठे खड्डे खोदून तसेच सोडून दिले होते. विशेषतः गटारीचे काम अपूर्ण राहिल्याने रस्त्याच्या मध्यभागी निर्माण झालेली खड्डी ही वाहनचालकांसाठी मोठा धोका ठरत होती. दुचाकीस्वारांचे अपघात वारंवार घडत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता.

सदर समस्येकडे भाजप नेते उमेश फेगडे यांनी वेळोवेळी नगर परिषदचे लक्ष वेधले. मात्र समाधानकारक कारवाई न झाल्यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढत होती. अशा वेळी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने या समस्येची गंभीर दखल घेत सलग बातम्या प्रसिद्ध करत प्रशासनावर दबाव निर्माण केला. त्यानंतर अखेर नगर परिषदने पावले उचलत सदर खड्ड्यावर मजबूत ढापा टाकण्याचे काम हाती घेतले.

या कामामुळे आता रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. वारंवार अपघात होणारा हा मार्ग आता सुरक्षित झाला असून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच जीव टांगणीला लागण्याची वेळ टळली आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी उमेश फेगडे यांचे आणि या मुद्द्यावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे आभार मानले. “खरं तर हा रस्ता महत्त्वाचा असून यावर प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक होते. उमेश फेगडे यांनी योग्य वेळी पाठपुरावा केल्यामुळेच आज आम्हाला हा दिलासा मिळतो आहे,” असे प्रतिपादन अनेक स्थानिकांनी केले.


Protected Content

Play sound