बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशभरात शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत असताना देवीच्या मूर्तींमध्ये शक्तीचं रूप पाहायला मिळतंय. पण बुलढाणा जिल्ह्यात मात्र ही शक्ती मूर्तीत नाही, तर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर उभी आहे. अतिवृष्टीने थैमान घातलेल्या शिवारात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ॲड. शर्वरी तुपकर स्वतः बांधावर गेल्या आणि धीराचे शब्द देत एक वेगळीच शक्तिपूजा घडवून आणली.

सिंदखेड राजा तालुक्यातील दत्तापूर, भोसा, शेलू, वर्दडी आणि सोनोशी या गावांमध्ये गेल्या काही दिवसांत त्यांनी दौरे करत पीक परिस्थितीची पाहणी केली. सोयाबीन व कपाशी यांसारखी प्रमुख पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मातीमोल झाल्या आहेत. काही ठिकाणी बांध फुटले, जमिनी खरडून गेल्या, विहिरीही खचल्या. हे दृश्य पाहून सामान्य माणूस हादरेल, पण शर्वरी तुपकरांनी मात्र या हताश शेतकऱ्यांसमोर जाऊन ठामपणे उभं राहत त्यांना नवे बळ दिलं.

“या संकटात खचून जाऊ नका. सरकारकडून शंभर टक्के भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही संघर्ष करू. आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असं सांगत त्यांनी एक नवा आत्मविश्वास शेतकऱ्यांच्या मनात पेरला.
नवरात्र म्हणजे केवळ आरती, पुजा आणि मंत्र नव्हे. ती आहे एका स्त्रीची भूमिका, जी संकटात उभी राहते. मूर्तीतील नव्हे, तर कृतीतील शक्तीचं दर्शन घडवत शर्वरी तुपकरांनी खरी नवरात्री साजरी केली. त्यांच्या या उपस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला. महिला शेतकरी म्हणाल्या, “शर्वरी ताईंनी दिलेला धीर खऱ्या अर्थाने नवरात्रीचा प्रसाद वाटल्यासारखा आहे. त्यांच्या शब्दांनी आमचा आत्मविश्वास दुणावला आहे.”
शासकीय यंत्रणांनी अद्यापही केवळ आश्वासनांच्या चौकटीत अडकलेली मदत देताना शेतकऱ्यांना फारसा दिलासा दिलेला नाही. याच पार्श्वभूमीवर शर्वरी तुपकर यांनी “शंभर टक्के भरपाई ही फक्त गरज नाही, तर हक्क आहे,” हे स्पष्टपणे अधोरेखित करत राज्यकर्त्यांना जाब विचारला.
त्यांच्या या ठाम आणि व्यावहारिक भूमिकेमुळे नवरात्रीचा सण सामाजिक न्याय व जबाबदारीची आठवण करून देणारा एक प्रेरणादायी उत्सव ठरतो आहे. बांधावरून उमटलेला त्यांच्या आवाजातला धीर नवरात्रीच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या गजराइतकाच प्रभावी ठरतो आहे.



