Home क्राईम जळगावात 36 लाखांची घरफोडी उघड; चार आरोपींना अटक, 310 ग्रॅम सोने जप्त

जळगावात 36 लाखांची घरफोडी उघड; चार आरोपींना अटक, 310 ग्रॅम सोने जप्त

0
164


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रामानंद नगर पोलिसांनी एका महत्त्वपूर्ण कारवाईत घरफोडीच्या गुन्ह्यातील तब्बल 310 ग्रॅम सोने आणि 250 ग्रॅम चांदीसह 36 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे केवळ एकच नाही, तर दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश वर रेड्डी यांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी की, 1 जून रोजी लिलाधर शांताराम खंबायत यांनी रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांचे साडू नरेंद्र बाध हे परदेशी गेलेले असताना, 15 मे ते 1 जून या कालावधीत त्यांच्या मोहाडी रोड, पार्वतीबाई काळे नगर येथील बंद घरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातून 357 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 250 ग्रॅम वजनाची चांदीची भांडी व दागिने आणि 85 हजार रुपये रोख रक्कम तसेच डीव्हीआर, वायफाय मॉडेल असा एकूण 36 लाख 83, हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

गुन्हा दाखल होताच, पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो., अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापूरे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला.

19 सप्टेंबर रोजी रात्रीच्या गस्तीवर असताना सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या पथकाला दोन इसम संशयीत रित्या फिरताना आढळले. पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी मोहाडी रोड येथील घरफोडीची कबुली दिली. आरोपी रवि प्रकाश चव्हाण (वय 21, रा. तांबापूरा) आणि शेख शकील शेख रफीक (वय 30, रा. रामनीगंज) यांना अटक करण्यात आली.

या आरोपींच्या माहितीवरून त्यांचे साथीदार जनंद उर्फ मस्तकीम भिकन शहा आणि गुरुदयालसिंग मनजित टाक यांनाही 20 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.

तपासादरम्यान, आरोपींनी सोने-चांदीचे दागिने सुरत व जामनेर येथे विकल्याचे कबूल केले. त्यानुसार रामानंद नगर पोलिसांनी वेगाने कारवाई करत, चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 33 लाख 83 हजार किमतीचे 310 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 250 ग्रॅम चांदीची लगड असा ऐवज हस्तगत करण्यात यश मिळवले. या यशस्वी कामगिरीमुळे रामानंद नगर पोलीस ठाण्यात सह इतर दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचा असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.


Protected Content

Play sound