Home Cities एरंडोल शास्त्री फार्मसी महाविद्यालयात फार्मासिस्ट दिवस विविध उपक्रमांनी साजरा

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात फार्मासिस्ट दिवस विविध उपक्रमांनी साजरा

0
244


एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ येथे २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिवस विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आरोग्य व्यवस्थेतील फार्मासिस्टच्या योगदानाची जाणीव वाढवणारा हा दिवस विविध स्तरांवर जनजागृती करीत एक प्रेरणादायी अनुभव ठरला.

या दिवसाच्या निमित्ताने सकाळी एरंडोल शहरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली तिरंगा चौकातून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गांवरून फेरफटका मारत पुन्हा तिरंगा चौकात येऊन विसर्जित झाली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषणा देत फार्मासिस्टच्या सामाजिक व वैद्यकीय भूमिकेचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवले. रॅली दरम्यान सादर करण्यात आलेल्या पथनाट्याने औषधोपचारातील योग्य मार्गदर्शनाच्या गरजेवर प्रकाश टाकला. रॅलीत एरंडोल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पाटील, माजी अध्यक्ष कैलास न्याती, मान्यवर मनोहर पाटील व भूषण पाटील हे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शहरातील कार्यरत फार्मासिस्टांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

दुपारच्या सत्रात महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत प्रा. संजय लढे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून “फार्मसी शिक्षण हे केवळ करिअरपुरते मर्यादित नसावे, तर समाजासाठी काही करण्याची जाणीवही ठेवावी” असा मौल्यवान संदेश दिला. त्यांनी जागतिक आरोग्य व्यवस्थेतील फार्मासिस्टच्या भूमिकेवर सखोल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण केले.

सामाजिक सहभाग सुनिश्चित करत महाविद्यालयाने पळासदळ गावात मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन केले. या शिबिराला गावकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि फार्मासिस्टच्या समाजाशी असलेल्या नात्याची जाणीव यानिमित्ताने अधिक दृढ झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री आणि उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शास्त्री यांनी फार्मासिस्टला आरोग्य व्यवस्थेतील एक अनिवार्य कडी ठरवले. “डॉक्टर व रुग्ण यांच्यामध्ये फार्मासिस्ट हा विश्वासार्ह दुवा असतो,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे नियोजन उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. अनुप कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर प्रा. जावेद शेख यांनी आभारप्रदर्शन व्यक्त केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडला.


Protected Content

Play sound