Home राज्य ‘स्वस्थ नारी – सशक्त कुटुंब’ शिबिरात २०० विद्यार्थिनींची तपासणी

‘स्वस्थ नारी – सशक्त कुटुंब’ शिबिरात २०० विद्यार्थिनींची तपासणी

0
184


खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  केंद्र सरकारच्या ‘स्वस्थ नारी – सशक्त कुटुंब’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन, खामगाव येथे २५ सप्टेंबर रोजी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली, तसेच आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती घडवून आणण्यात आली. विद्यार्थिनींच्या आरोग्यविकासासाठीचा हा स्तुत्य उपक्रम संस्थेच्या पुढाकारातून आणि पंचशील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने राबविण्यात आला.

शिबिराचे उद्घाटन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांच्या हस्ते झाले. पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालय, खामगाव येथील वैद्यकीय तज्ज्ञ पथकात डॉ. विप्लव कवीश्वर, डॉ. नीलिमा वानखेडे, डॉ. मयुरी बकाल, डॉ. अश्विनी ढगे आणि सहाय्यक कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब मापन, हिमोग्लोबिन तपासणी तसेच प्राथमिक लक्षणांवर वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्यात आले. सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. डॉक्टरांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत संतुलित आहार, नियमित व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता आणि मानसिक आरोग्य याचे महत्व स्पष्ट केले.

आरोग्य शिबिरानंतर ‘मासिक पाळी स्वच्छता, आरोग्य व जनजागृती’ या विषयावर डॉ. नीलिमा वानखेडे यांनी विद्यार्थिनींना समजून सुलभ भाषेत सविस्तर मार्गदर्शन केले. मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, योग्य सॅनिटरी उत्पादने, पोषणाचे महत्त्व आणि अनियमिततेकडे दुर्लक्ष केल्यास होणारे संभाव्य परिणाम याविषयी माहिती दिली. विद्यार्थिनींनी या सत्रात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन वैयक्तिक शंका उपस्थित करून सक्रिय सहभाग नोंदविला.

शिबिरानंतर प्राचार्य डॉ. प्रभुणे यांनी पंचशील होमिओपॅथिक महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की, “विद्यार्थिनींचे आरोग्य सक्षम असले तरच त्यांचे शिक्षण व व्यक्तिमत्त्व समृद्ध होईल. अशा उपक्रमांमुळे त्यांना आत्मभान आणि आत्मविश्वास प्राप्त होतो.” तसेच शिबिरामुळे नियमित तपासणी, योग्य आहार आणि स्वच्छतेबाबतची जाणीव विद्यार्थिनींत निर्माण झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. रेशमी भारसाकळे, प्रा. ललिता सुलतान, प्रा. सागर जुमडे आणि सहाय्यक वर्ग यांनी मन:पूर्वक परिश्रम घेऊन केले. कार्यक्रमाला महिला अधिकारी, महिला कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रा. राजेश मंत्री यांनी या उपक्रमाबाबत अधिकृत माहिती एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.


Protected Content

Play sound