जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली. या घटनेमुळे गणेश कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय घडली?
अरुणा रामदास कोलते (वय ६८, रा. गणेश कॉलनी, जळगाव) या वृद्ध महिला आपल्या कुटुंबियांसह गणेश कॉलनी परिसरात वास्तव्याला आहेत. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्या घरासमोर उभ्या होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ थांबून पत्ता विचारण्याचा बहाणा केला. या संधीचा फायदा घेत, या चोरट्यांनी अरुणा कोलते यांच्या गळ्यातील अंदाजे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तातडीने जबरी हिसकावली आणि ते दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाले.

आरडाओरड निष्फळ
चोरट्यांनी पोत हिसकावताच अरुणा कोलते यांनी आरडाओरड केली, परंतु चोरटे तोपर्यंत अंधाराचा फायदा घेऊन निघून गेले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वृद्ध महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर अरुणा कोलते यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहेत. पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



