Home Cities जळगाव विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे दूरदृष्य संवादातून मार्गदर्शन

विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे दूरदृष्य संवादातून मार्गदर्शन

0
127

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छता ही सेवा” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून “एक दीन, एक घंटा, एक साथ – राष्ट्र स्वच्छता अभियान” अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यात आली. या कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात ५ लाखांवर पोहोचल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, “या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम केवळ सेवा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठीही उपयुक्त ठरतात.” समाजातील समस्या समजून घेऊन भविष्यात जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य एनएसएसमुळे शक्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत त्यांचे “एकात्म मानवतावाद” हे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीवर परिणाम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयांमध्ये स्वच्छता उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांनी त्यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक परिसराची स्वच्छता राखण्यावर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मंत्री पाटील यांनी सांगितले की, “स्वच्छतेतून संस्कार रुजतात. ही केवळ शारीरिक सफाई नसून मानसिक शुद्धतेची प्रक्रिया आहे.”

कार्यक्रमासाठी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास दांडगे, मनोज इंगोले व डॉ. कविता पाटील उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यापीठातील स्वयंसेवकांनी कॅम्पस परिसरात स्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला.


Protected Content

Play sound