Home Cities जळगाव राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल जाहीर ; चोपडा नगरपरिषदेच्या “पर्यावरणपूरक मानाचा गणपती” मंडळास जिल्ह्यात...

राज्यस्तरीय स्पर्धेचे निकाल जाहीर ; चोपडा नगरपरिषदेच्या “पर्यावरणपूरक मानाचा गणपती” मंडळास जिल्ह्यात पहिला क्रमांक

0
180

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राज्य शासनाच्या ‘राज्य महोत्सव’ उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ चे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले असून, यामध्ये चोपडा नगरपरिषदेच्या “पर्यावरणपूरक मानाचा गणपती” मंडळाने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावून मानाचा तुरा खोवला आहे. या यशामुळे चोपडा शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

राज्यभरातून १३९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड विशेष समित्यांद्वारे करण्यात आली. राज्यस्तरीय निकालांमध्ये प्रथम क्रमांक सांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा (ता. खानापूर) यांना मिळाला असून, दुसरा क्रमांक लातूर येथील वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव मंडळ आणि तिसरा क्रमांक अहमदनगरच्या सुवर्णयुग तरुण मंडळ, पाथर्डी यांना देण्यात आला आहे. या विजेत्या मंडळांना अनुक्रमे ७.५ लाख, ५ लाख व २.५ लाख रुपयांची रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील जिल्हास्तरीय स्पर्धेत चोपडा नगरपरिषदेच्या मंडळाने “पर्यावरणपूरक” संकल्पनेवर आधारित सजावट व सामाजिक संदेश दिल्यामुळे प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक श्री वज्रेश्वरी देवी गणेश मंडळ, जळगाव व शिवमुद्रा प्रतिष्ठान, भुसावळ यांना मिळाला आहे. तालुकास्तरावर रावेर येथील श्री गजानन युवा मित्र मंडळाची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये तर तालुकास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचा उद्देश गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासणे, पर्यावरणपूरकतेचा प्रसार करणे व सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करणे असा आहे. शासनाने ही स्पर्धा राबवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एक सकारात्मक दिशा दिली असून, शिस्तबद्ध आणि सजग सण साजरे करण्याची चळवळ अधिक बळकट झाली आहे.

राज्यस्तरीय विजेत्यांचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. तर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विजेत्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर होणार आहे.


Protected Content

Play sound