मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी ठाम मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली असून, निवेदनावर अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सह्याही आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यात विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे केळी, कापूस, सोयाबीन, मका यांसारखी पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. ढगफुटीच्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे घास हिरावले गेले असून, पिके वाहून गेली किंवा सडून कुजली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले असून, अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत.

या परिस्थितीत शेतकऱ्यांकडे पिकांची फवारणी करण्यासाठी देखील आर्थिक साधने उपलब्ध नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसासोबत आलेले वादळी वारे, विजेचे लपंडाव, रासायनिक खतांचा तुटवडा आणि खतांचे गगनाला भिडलेले दर या सगळ्या अडचणींमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहे. त्यात आता अतिवृष्टीमुळे त्यांच्यावर आणखी संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रत्येक बाधित शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने देण्यात यावे, तसेच मुक्ताईनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. ही मागणी विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी प्रदेश प्रवक्ते अॅड. अरविंद गोसावी, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संजय चौधरी पाटील, काँग्रेस सेवा दलाचे तालुका अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, अंतुर्ली शहर अध्यक्ष शेख भैय्या शेख करीम, मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बी.डी. गवई, संजय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते, ज्यांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आणि लवकरात लवकर आर्थिक मदतीसाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.



