Home पर्यावरण वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी  

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी  

0
102


भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे भोगवती नदीला मोठा पूर आल्याने परिसरातील शेती पाण्याखाली गेली असून, नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करत नुकसानग्रस्तांना शासनातर्फे तात्काळ मदत देण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.

वरणगाव शहर व परिसरात पूरस्थितीमुळे अनेक घरे, दुकाने, सार्वजनिक ठिकाणे जलमय झाली असून, पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. साकेगाव येथील लक्ष्मण वसंत ठाकरे या नागरिकाचा नदीपात्रात वाहून जाऊन मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने चार लाख रुपयांची मदत मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते अक्काबाई सुधाकर भिल यांना सुपूर्त करण्यात आली.

पंचनामे त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले असून, प्रत्यक्षात तहसीलदार नीता लबडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आदींनी घटनास्थळाची पाहणी करून मदत कार्य सुरू केले आहे.

पूरामुळे आचेगाव, पिंपळगाव, तळवेल, ओझरखेडा, काहूरखेडा, बोहर्डी व कठोरा या गावांचा संपर्क तुटला असून, काही घरांची भिंती कोसळून नागरिक जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतींनी तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू केल्याचे प्रशासनाने सांगितले.

प्रत्येक गावात महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. पाणी उपसण्यासाठी नगरपालिका पातळीवर पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रस्ते मोकळे करण्यासह वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे कामही सुरू आहे.

प्रशासनाने नागरिकांना नदी व नाल्यांच्या काठावर न जाण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही अडचणीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound