
सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । त्र्यंबकेश्वर येथे योगेश खरे, अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे या तिघा पत्रकारांवर करण्यात आलेल्या भ्याड व अमानुष हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडिया – रावेर तालुका व ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट असोसिएशन – सावदा तालुका यांच्यातर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. पत्रकारांवरील हल्ला म्हणजे केवळ व्यक्तीगत नसून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला थेट आघात असल्याची तीव्र भावना संघटनांनी व्यक्त केली आहे.

पत्रकार समाजाचे प्रहरी असून, समाजातील चुकीच्या घटनांचा व भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करणे हीच त्यांची जबाबदारी आहे. परंतु याच जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणाऱ्या पत्रकारांना गप्प करण्यासाठी गुंड प्रवृत्तीने हल्ले करण्याचे प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. पत्रकारांवरचा हा हल्ला केवळ एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सत्तेच्या गैरवापराविरुद्ध उभे राहणाऱ्या प्रत्येक आवाजावर आघात करणारा आहे, असे मत संघटनांनी स्पष्टपणे नोंदवले.
पत्रकार संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की, या हल्ल्याच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा सुनावण्यात यावी. तसेच राज्यात पत्रकारांसाठी विशेष सुरक्षा कायदा तयार करून त्यांना संरक्षण देण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाव्यात. अन्यथा पत्रकार समाज व जागरूक जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
सत्य मांडणाऱ्या पत्रकारांच्या आवाजाला कुठल्याही दबावाखाली थांबवता येत नाही, हे इतिहासाने वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळे समाजात जागरूकता निर्माण करणाऱ्या, जनतेच्या प्रश्नांना आवाज देणाऱ्या पत्रकारांची गळचेपी रोखण्यासाठी प्रशासन व सरकारने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून जोरकस करण्यात आली आहे.



