पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरण पूर्णपणे भरले असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी ७ वाजता धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग बोरी नदीपात्रात सोडण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२ सप्टेंबर रोजीच बोरी धरण १००% भरले होते, मात्र आता संततधार पावसामुळे पाणी पातळी वाढल्याने पाण्याचा विसर्ग वाढवावा लागला आहे. सध्या पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा प्रवाह कमी-जास्त केला जात आहे. तरीही नागरिकांनी, विशेषतः नदीकाठच्या रहिवाशांनी, सतर्क राहण्याचे आवाहन बोरी धरण प्रशासनाने केले आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान
या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत मोठे नुकसान झाले आहे. तामसवाडी, आडगाव, मुंदाने, तरवाडे, देवगाव आणि शिरसमणी यांसारख्या गावांमध्ये सर्व पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने लवकरात लवकर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.



