
पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यात प्रथमच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘दुर्गा दौड’ला उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या या दौडमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, शिवप्रेमी सेना आणि सकल हिंदू समाजासह विविध सामाजिक संघटनांचे युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

हा ‘दुर्गा दौड’ उपक्रम राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती आणि देशभक्तीचे जागरण करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पोटात असताना अखंड नऊ दिवस तुळजाभवानीचा जागर करून देव, देश आणि धर्मासाठी वरदान मागितले होते, त्याच परंपरेचे स्मरण करून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या दौडचा मुख्य उद्देश उगवत्या तरुण पिढीला व्यसनमुक्त, राष्ट्रभक्त आणि धर्मभक्त बनवणे आहे. दररोज पहाटे ६ वाजता देशभक्तीपर गीते आणि श्लोक म्हणत, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारांवर चालण्याची प्रेरणा तरुणांना दिली जात आहे. या दोन महापुरुषांच्या कार्याचे ध्येय आणि धोरणे अंगीकारून राष्ट्र उभारणीसाठी तरुणांनी योगदान द्यावे, हीच या उपक्रमामागील मुख्य भावना आहे.
या दुर्गा दौडमध्ये जात, धर्म, पक्ष किंवा गट-तट यापेक्षा राष्ट्रनिर्माणाचा विचार महत्त्वाचा मानला जातो. “मी कोण, तू कोण” या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन, सर्व हिंदूंना भगव्या ध्वजाखाली एकत्र आणणे हे या दौडचे उद्दिष्ट आहे. दोन पताका असलेल्या भगव्या ध्वजाचे राज्य स्थापन करण्याची ही संकल्पना या ‘दुर्गा दौड’च्या माध्यमातून मांडली जात आहे. हा उपक्रम केवळ एक रॅली नसून, तो एकात्मता, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची शिकवण देणारा आहे.



