Home धर्म-समाज संत मुक्ताई जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात रंगला; मान्यवर व  भाविकांच्या उपस्थितीत झाला जागर

संत मुक्ताई जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात रंगला; मान्यवर व  भाविकांच्या उपस्थितीत झाला जागर

0
222


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  संत परंपरेतील अद्वितीय स्थान असलेल्या संत मुक्ताई साहेबांचा 746 वा जन्मोत्सव सोहळा यंदा नवरात्रीच्या पहिल्या माळेला, अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर, अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संत मुक्ताई संस्थान व श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदवला.

सोहळ्याची सुरुवात सकाळी 10.30 वाजता श्री दुर्गा सप्तशती पारायणाने झाली. त्यानंतर संत मुक्ताई विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी सामूहिकरित्या अध्याय पठण करत भक्तीमध्ये स्वतःला चिंब भिजवले. दुपारी 12 वाजता विशेष अध्याय पठणादरम्यान संत मुक्ताई साहेबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि संपूर्ण मंदिर परिसर “जय मुक्ताई!” या जयघोषांनी निनादून गेला. या वेळी जन्मोत्सवाचा विशेष अध्याय पार पडताना उपस्थित भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते.

संत मुक्ताई यांचा जन्म नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी झाल्याने, हा दिवस भक्तांसाठी दुहेरी आनंदाचा ठरतो. अद्वितीय अधिकार प्राप्त असलेल्या या संत भगिनीचे “कडाडली निरंजनी जेव्हा, मुक्ताई गुप्त झाली तेव्हा” असे अभंगांतून वर्णन करणारे संत निळोबाराय यांचे अभंग आजही भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. याच परंपरेचा जागर आज हजारो भक्तांच्या सहभागातून अनुभवास मिळाला.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या तयारीच्या घाईत असतानाही हजारो महिला भाविकांनी आपल्या घरगुती कामांना थांबवत या पारायण सोहळ्यास हजेरी लावली. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकरी परिवाराने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी उत्साहात सहभाग घेतला. या भक्तीमय वातावरणाने मंदिर परिसर नवचैतन्याने भरून गेला होता.

कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली. यामध्ये संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, काँग्रेसचे ओबीसी सेल उपप्रदेशाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख संजनाताई पाटील, तसेच रवींद्र हरणे महाराज, विशाल खोले महाराज, नितीन महाराज, पंकज महाराज यांच्यासह अन्य सेवेकरी व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound