Home क्राईम डॉक्टर महिलेशी अश्लिल वर्तवणूक : मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांना...

डॉक्टर महिलेशी अश्लिल वर्तवणूक : मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांना अटक

0
217

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना एका सहकारी डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (२१ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे मनपाच्या आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून, यापूर्वीच मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी डॉ. घोलप यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

या प्रकरणी एका ३८ वर्षीय डॉक्टर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मनपाच्या शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना डॉ. घोलप यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. त्यांनी अश्लील इशारे करत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, तसेच तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. विजय घोलप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली आहे.

डॉ. घोलप यांच्यावर अनेक दिवसांपासून विविध तक्रारी येत होत्या. सहकारी महिलेशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. याच दरम्यान, डॉ. घोलप यांच्या कार्यकाळात जन्म-मृत्यू नोंदणी विभागातही एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त असलेल्या एका महिलेच्या जागी तिचा पतीच कर्तव्य बजावत असल्याची माहिती उघड झाली होती. या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत तीन सदस्यीय चौकशी समितीने अहवाल आयुक्तांकडे सादर केला.

या अहवालानंतर, ‘विशाखा समिती’ने दिलेल्या प्राथमिक अहवालावर कारवाई करत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी डॉ. घोलप यांना दोषी ठरवत निलंबनाचे आदेश काढले. नैतिक आणि प्रशासकीय दोन्ही स्तरांवर गंभीर चुकीचे वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. डॉ. घोलप यांच्या अटकेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण महापालिका वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, या घटनेने प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Protected Content

Play sound