Home क्राईम  अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालना येथे हल्ला 

 अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालना येथे हल्ला 

0
238


जालना – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  जालना जिल्ह्यात रविवारी एक धक्कादायक प्रकार घडला असून, मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणारे अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला चढवल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार पोलिसांच्या बंदोबस्तात घडल्यामुळे सुरक्षेच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे जालना येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी दुपारी जालना दौऱ्यावर होते. त्यांचा गाड्यांचा ताफा मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उभे होते. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असला तरी काही आंदोलक पोलिसांना चकवा देत थेट सदावर्ते यांच्या गाडीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. या आंदोलकांनी त्यांच्या लिमोझिन गाडीवर धाव घेत काचांवर जोरदार फटके मारले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना अडवले आणि त्यांना ताब्यात घेतले. या हल्ल्यात गाडीचे किरकोळ नुकसान झाले असून, अ‍ॅड. सदावर्ते यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. अशा पार्श्वभूमीवर आता जर या घटनेतील आरोपींवर गुन्हे दाखल करून कारवाई झाली, तर मनोज जरांगे पाटील आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात सतत आवाज उठवत आले आहेत. त्यांनी केवळ आरक्षणालाच नाही तर आंदोलनाच्या नेत्यांनाही आक्षेपार्ह भाषेत टीकेचे लक्ष्य केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते मराठा आंदोलकांच्या रोषाचे धनी बनले आहेत. यापूर्वीही त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी आंदोलकांनी गाड्यांचे नुकसान केल्याचे प्रकार घडले आहेत.

या हल्ल्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरचा तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला असून, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनासाठीही ही एक मोठी जबाबदारी ठरणार आहे. अ‍ॅड. सदावर्ते यांच्या विरोधातील असंतोष आता उघड हिंसक स्वरूप धारण करत असल्याचेही यानिमित्ताने दिसून आले.


Protected Content

Play sound