Home Cities जळगाव डीजेमुळे अनेक आजार, पारंपरिक वाद्यांचाच वापर व्हावा !; विजय काटकर

डीजेमुळे अनेक आजार, पारंपरिक वाद्यांचाच वापर व्हावा !; विजय काटकर

0
164


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  संगीत क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व आर. बी.पाटील नाना यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त, उद्या सोमवार, २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ‘R D नाना’ या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. आर. बी. पाटील मित्र परिवार आणि विद्या प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पंचमदांच्या सुमधुर गीतांनी जळगावकरांना मंत्रमुग्ध करण्यात येणार आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, आर. डी. बर्मन यांच्यासोबत १२ वर्षे मूळ वादक म्हणून काम केलेले प्रसिद्ध संगीतकार विजय काटकर हे विविध वाद्यांच्या साथीने आपली कला सादर करणार आहेत. जळगावकरांना थेट पंचमदांच्या काळात घेऊन जाण्याचा अनुभव विजय काटकर यांच्या सादरीकरणातून मिळणार आहे. त्यांच्यासोबत स्थानिक प्रतिभावान गायक, ज्यात पोलीस गायक संघपाल तायडे, डॉ. राजेश पाटील आणि सोनाली कपोते यांचा समावेश आहे, आर. डी. बर्मन यांची गाणी सादर करतील.

कार्यक्रमाच्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत विद्या प्रबोधिनीचे संचालक योगेश पाटील यांनी सांगितले की, जळगावकरांनी या अनोख्या संगीत मैफिलीचा आस्वाद घ्यावा. यावेळी उपस्थित असलेल्या विजय काटकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर भाष्य केले. रिमिक्स गाण्यांमुळे मूळ संगीताचे महत्त्व कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच, इंडियन आयडॉल किंवा सारेगमप सारखे टीव्हीवरील संगीत कार्यक्रम स्क्रिप्टेड (आधीच तयार केलेले) असतात आणि फक्त टीआरपी मिळवण्यासाठी गायकांना गरीब किंवा असहाय्य दाखवण्याचा प्रयत्न करतात, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. त्यामुळेच अशा कार्यक्रमांमध्ये मी कधीही सहभागी होत नाही, असेही ते म्हणाले.

विजय काटकर यांनी डीजे संस्कृतीवरही जोरदार टीका केली. डीजेच्या वाढत्या वापरामुळे अनेक लोकांना बहिरेपणासारखे आजार होत असल्याचे सांगत त्यांनी डीजेवर बंदी आणण्याची मागणी केली. पारंपारिक वाद्यांचे महत्त्व पुन्हा रुजवून त्यांनाच प्रोत्साहन दिले पाहिजे असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला मिलिंद पाटील, कामगार कल्याण अधिकारी आणि आर. बी. नाना पाटील मित्र परिवार उपस्थित होता.


Protected Content

Play sound