Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात लंपी आजाराचा फैलाव; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान 

अमळनेर तालुक्यात लंपी आजाराचा फैलाव; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान 

0
183


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, खेडी, वासरे, निम तांदली, मारवड या गावांमध्ये लंपी स्किन आजाराचा जोरदार प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. गाई, म्हशी, बैल, अगदी लहान वासरांनाही या संसर्गजन्य रोगाने ग्रासले असून, जनावरे दगावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

कळमसरे व पाडळसरे गावांतील अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू लंपी आजारामुळे झाला आहे. या रोगामुळे जनावरांच्या शरीरावर गाठी येणे, ताप येणे, अन्न न खाणे आणि नंतर हळूहळू मृत्यू ओढवणे अशा स्वरूपाचे परिणाम दिसून येत आहेत. सद्यस्थितीत या गावांमध्ये अनेक जनावरे गंभीर अवस्थेत आजारी असून, पशुधनाची देखभाल व उपचार खर्च शेतकऱ्यांना परवडणारे राहिलेले नाहीत. काही शेतकऱ्यांचे एकाच वेळी गाय व वासरू दगावल्याने त्यांना लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे.

लंपीमुळे शेतकऱ्यांचे दुधाचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले असून, शेतीसाठी उपयोगी असलेल्या बैलांचे नुकसान झाल्याने आगामी हंगामासाठीची शेतीकामेही संकटात सापडली आहेत. या गंभीर परिस्थितीत प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना, लसीकरण मोहीम राबवणे आणि जनावरांच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई देणे, या तीन प्रमुख मागण्या शेतकरी जोरदारपणे मांडत आहेत.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यात लंपीचा फैलाव मोठ्या प्रमाणावर असून, वेळीच प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास आणखी मोठ्या प्रमाणात पशुधन दगावण्याची शक्यता आहे. यासाठी लसीकरणाच्या मोहिमा गावपातळीवर तातडीने राबवण्याची गरज आहे. तसेच, आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे जनावरे दगावले आहेत, त्यांना योग्य तो मोबदला मिळावा, हीही मागणी जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound