जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । युवतींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी जळगावात आयोजित करण्यात आलेल्या ‘स्मार्ट गर्ल’ प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढण्यास मोठी मदत झाली आहे. श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ आणि भारतीय जैन संघटनेच्या महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे २० सप्टेंबरपासून सुरू झाले आहे.
या शिबिरात १४ ते २२ वयोगटातील ३० मुलींनी सहभाग नोंदवून, दोन दिवसांच्या वैचारिक प्रवासाला सुरुवात केली. नाशिक येथील प्रसिद्ध प्रशिक्षक सतीश भुतडा यांनी या शिबिराचे सत्र घेतले. त्यांनी मुलींशी संवाद साधत पालकांसोबतचे संवाद कौशल्य, मैत्रीमध्ये आवश्यक असणारी जागरूकता, सोशल मीडियाचा सुरक्षित व योग्य वापर, आणि निर्णयक्षमता अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. त्यांची संवादशैली, उदाहरणांसह केलेली मांडणी आणि खुले संवादाचे वातावरण यामुळे सहभागी मुलींनी भरभरून प्रतिसाद दिला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कस्तुरचंद बाफना, अनिल कोठारी, भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनयजी पारेख, प्रोजेक्ट डायरेक्टर पंकज जैन, तसेच अजय राखेचा, कल्पना नाहाटा, सुहानी सुराणा, सोनम जैन, गरिमा राका, सपना कुमट, सारिका जैन आणि सोनाली तातेड यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. या मान्यवरांनी शिबिरामागील उद्देश, समाजातील बदलत्या गरजा आणि अशा उपक्रमांची आवश्यकता यावर प्रकाश टाकला.
शिबिरादरम्यान मुलींनी स्वतःचे विचार मांडले, अनुभव शेअर केले आणि सत्रांमध्ये सहभाग घेत प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची आणि स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवण्याची शिकवण या प्रशिक्षणातून मिळाल्याचे मत अनेक विद्यार्थिनींनी व्यक्त केले. ‘स्मार्ट गर्ल’ उपक्रमामुळे केवळ माहिती नव्हे तर समुपदेशनाचा अनुभवही लाभला, ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडत आहे.



