Home Cities जामनेर “‘जाऊ नका सर…!’ नवी दाभाडी शाळेत भावनिक निरोप; विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर”

“‘जाऊ नका सर…!’ नवी दाभाडी शाळेत भावनिक निरोप; विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर”

0
211


जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जामनेर तालुक्यातील नवी दाभाडी येथील जिल्हा परिषद शाळेत एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. शाळेतील दोन लोकप्रिय शिक्षकांची बदली झाल्यामुळे संपूर्ण शाळेत भावनिक वातावरण निर्माण झाले. शिक्षक गजानन माणिक मंडवे आणि ऋषिकेश विश्वनाथ शिंदे या दोन शिक्षकांचा निरोप देताना विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अश्रू अनावर झाले. “जाऊ नका सर… आम्हाला सोडून जाऊ नका!” असा टाहो चिमुकल्यांनी फोडला आणि संपूर्ण परिसर भावविवश झाला.

गजानन मंडवे व ऋषिकेश शिंदे या दोघा शिक्षकांनी आपल्या वेगळ्या आणि प्रभावी अध्यापनशैलीने या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावला होता. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर प्रेम, आपुलकी, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिकच नव्हे, तर वैचारिक घडामोडी घडल्या. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्याशी भावनिक पातळीवर खूपच जोडले गेले होते.

या शाळेत पाचवीपर्यंतचे वर्ग असून दरवर्षी ५-६ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवतात. तसेच “मंथन प्रज्ञाशोध परीक्षा” मध्ये गुणवत्तापूर्वक कामगिरी करणारे विद्यार्थी याच शाळेतून घडले आहेत. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत या शाळेला तृतीय क्रमांकाचे बक्षीसही प्राप्त झाले आहे. या सर्व यशात मंडवे व शिंदे या शिक्षकांचे योगदान मोलाचे होते.

कार्यमुक्त होण्यासाठी शिक्षक शाळेत पोहोचताच विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षक भावनाविवश झाले. निरोपाच्या वेळी लहानग्यांनी शिक्षकांना गराडा घातला, अनेक विद्यार्थी त्यांना बिलगून रडू लागले. “सर, आम्हाला सोडून जाऊ नका!” असा आक्रोश करीत अनेकांचे डोळे पाणावले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे डोळे पुसताना स्वतःच्या अश्रूंना आवर घातला. उपस्थित प्रत्येकजण त्या भावनिक क्षणाचा साक्षीदार झाला.

हे दृश्य पाहून स्पष्ट होत होते की, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातं हे केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसून ते प्रेम, समर्पण आणि विश्वासाने जोडलेले असते. या भावनिक क्षणाने नवी दाभाडीच्या जिल्हा परिषद शाळेच्या आठवणीत एक अमिट ठसा उमटवला.


Protected Content

Play sound