Home क्राईम ब्रेकींग : सासरच्या जाचाला कंटाळून गरोदर विवाहितेनं घेतलं टोकाचं पाऊल !

ब्रेकींग : सासरच्या जाचाला कंटाळून गरोदर विवाहितेनं घेतलं टोकाचं पाऊल !

0
336


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या एका विवाहितेने सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला आणि पाच महिन्यांचा गर्भपात करण्यासाठी टाकण्यात आलेल्या दबावाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सासरच्या मंडळींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रज्ञा चेतन शेळके (वय २२, रा. करजयी, ता. चाळीसगाव, ह.मु. शिरसोली, ता. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

दोन कुटुंबांमध्ये दु:खाचे वातावरण
प्रज्ञाचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील करजयी येथील चेतन शेळके यांच्याशी १ एप्रिल २०२४ रोजी झाला होता. लग्नानंतर प्रज्ञा आणि तिचा पती दोघेही पुण्यात राहत होते. प्रज्ञा ही पाच महिन्यांची गर्भवती होती, मात्र काही कारणास्तव ती माहेरी शिरसोली येथे परतली होती. गुरुवारी दुपारी तिच्या आई-वडिलांनी शेतात काम करण्यास गेलेले असताना, प्रज्ञाने घरातच गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

गर्भपाताचा दबाव असल्याचा आरोप
प्रज्ञाचे वडील भागवत धामणे शेतातून परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून पाहणी केली असता प्रज्ञा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी तातडीने तिला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. प्रज्ञाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरकडील मंडळी तिला सतत त्रास देत होते आणि तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकत होते. या मानसिक त्रासाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांचा पुढील तपास सुरू
या घटनेने शिरसोली गावात शोककळा पसरली असून, प्रज्ञाच्या कुटुंबियांनी सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रज्ञाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबियांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.


Protected Content

Play sound