Home Cities जामनेर जामनेरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस; नेरी गाव जलमय, जळगाव-जामनेर रस्ता बंद

जामनेरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस; नेरी गाव जलमय, जळगाव-जामनेर रस्ता बंद

0
617

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या संततधार व ढगफुटीसदृश्य पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नेरी, सूनसगाव यांसह परिसरातील गावांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले. परिणामी जळगाव-जामनेर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्ते बंद झाल्याने नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भागातील नदी-नाले तुडुंब भरल्याने वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

कांग नदीलाही जोरदार पुराचा फटका बसला आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतात उभे असलेले पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, जामनेर शहरातील अनेक शाळांना पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीची पाहणी करून योग्य ती मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

एकूणच, संततधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासन सतर्कतेच्या मोडमध्ये काम करत आहे.


Protected Content

Play sound