Home क्रीडा राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटीलचा झळाळता विजय, श्रद्धा इंगळेसोबत दुहेरी गटात सुवर्णपदक

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ओवी पाटीलचा झळाळता विजय, श्रद्धा इंगळेसोबत दुहेरी गटात सुवर्णपदक

0
172

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चंद्रपूर येथे पार पडलेल्या स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा 2025 मध्ये जळगाव जिल्ह्याची शान ओवी पाटील आणि कराडच्या श्रद्धा इंगळे यांनी १३ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात राज्य विजेतेपद पटकावून एक मोठा विक्रम केला आहे. या अभूतपूर्व कामगिरीमुळे जळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

दि. १० ते १४ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत ओवी पाटील (चाळीसगाव) व श्रद्धा इंगळे (कराड) या जोडीने आपल्या जबरदस्त खेळाने सुरुवातीपासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सेमी फायनलमध्ये त्यांनी मुंबई उपनगरच्या हेजल जोशी व स्पृहा जोशी या जोडीला 21-15 व 21-14 अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

अंतिम सामन्यात मुंबईच्या मायरा गोराडिया व कनक जलानी यांचा 21-14 व 21-15 अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करत ओवी-श्रद्धा जोडीने स्पर्धेचे सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्यांना ट्रॉफी, रोख रक्कम आणि प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या विजयामध्ये ओवीच्या वडिलांचा आणि प्रशिक्षकाचा मोठा वाटा असून, अमोल पाटील हे चाळीसगाव येथील काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालयात क्रीडा शिक्षक आहेत आणि त्यांनीच ओवीला प्रशिक्षण दिले आहे.

या ऐतिहासिक यशानंतर ओवी पाटील आणि अमोल पाटील यांचे जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, प्रशिक्षक किशोर सिंह आणि जळगावातील अनेक क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले. जळगाव रेल्वे स्थानकावर जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षक दीपिका ठाकूर यांच्या उपस्थितीत महिला खेळाडूंनी ओवीचा विशेष सत्कार केला.

विजय प्राप्त केलेल्या ओवी व श्रद्धा यांच्यासोबत प्रशिक्षक अमोल पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक एस. आर. विष्णू, राष्ट्रीय खेळाडू अरुंधती पंतावणे, प्रशिक्षक किशोर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. या यशामुळे ओवी पाटीलने जळगाव जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल केले आहे.


Protected Content

Play sound