Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जम्बो कार्यकारिणी गठीत 

अमळनेरमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाची जम्बो कार्यकारिणी गठीत 

0
158


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या तालुका व शहर कार्यकारिणीची प्रभावी स्थापना करण्यात आली असून, या बैठकीत समाजाच्या न्यायहक्कांसाठी एकसंघपणे लढण्याचा निर्धार करण्यात आला. माजी मंत्री आणि महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली. ही जम्बो कार्यकारिणी सामाजिक चळवळीला बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

अमळनेर शहर व तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी शनिवारी माळी मढीजवळील बहुउद्देशीय सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज पवार, जिल्हाध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, युवक जिल्हाध्यक्ष दीपक अनुष्ठान, जिल्हा सचिव लक्ष्मण महाले, संघटक धनराज मोरे, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करत, एकजूट आणि संघटनेची गरज अधोरेखित केली. त्यांनी सामाजिक न्यायासाठी आता रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ आली आहे, असं ठामपणे सांगितलं.

या बैठकीत अमळनेर शहर तालुकाध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक नरेश कांबळे, उपाध्यक्ष गणेश जाधव, सचिव सुनील मोरे यांची निवड करण्यात आली. तर अमळनेर तालुकाध्यक्ष म्हणून अरुण मोरे, उपाध्यक्ष प्रवीण वाघ व निवृत्ती बागुल, सचिव सागर मोरे यांची एकमताने निवड झाली. युवा तालुकाध्यक्षपदी रविंद्र ठाकरे, उपाध्यक्ष विनोद जाधव, सचिव रविंद्र साळुंखे यांची निवड झाली. अधिकारी-कर्मचारी विभागासाठी अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष विलास बिऱ्हाडे व डॉ. माणिक बागले, सचिव वसंत मोरे यांची जबाबदारी निश्चित झाली. महिला विभागासाठी अध्यक्षपदी उषा देवरे, उपाध्यक्ष भारती कार्लेकर व सुरेखा मोरे, सचिव प्रियंका अहिरराव यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बिऱ्हाडे यांनी तर आभारप्रदर्शन दंगल सोनवणे यांनी केले. या बैठकीतून नव्या कार्यकारिणीने सामाजिक एकजुटीचा नवा अध्याय सुरू करण्याचा आणि समाजहितासाठी मैदानात उतरून निर्णायक पावले उचलण्याचा संकल्प केला.


Protected Content

Play sound