Home आंतरराष्ट्रीय भारतीय ड्रेसिंगरूममध्ये बहिष्काराचे वादळ ; गंभीरने घेतली खास बैठक

भारतीय ड्रेसिंगरूममध्ये बहिष्काराचे वादळ ; गंभीरने घेतली खास बैठक

0
136

दुबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आज दुबईच्या मैदानात संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात होणार असताना, भारतीय संघाच्या ड्रेसिंगरूममध्ये मात्र वेगळाच तणाव निर्माण झाल्याचे समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीमुळे भारतीय खेळाडूंमध्ये या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची चर्चा सुरू झाली आहे. संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यात यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

2025 च्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत असतानाच, सामना सुरू होण्याच्या काही तास आधीच संघातील वातावरणात अस्वस्थता वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यामुळे भारतातील वातावरण आधीच चिघळले आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचा क्रीडा संबंध ठेवणे हे अयोग्य असल्याचे अनेक माजी खेळाडू आणि नागरिकांनी म्हटले होते. त्यामुळे या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी समाज माध्यमांवर जोर धरू लागली होती.

या पार्श्वभूमीवर, भारतीय ड्रेसिंगरूममध्ये बहिष्काराचा सूर उमटू लागल्याचे उघड झाले आहे. प्रमुख प्रशिक्षक गाैतम गंभीर यांनी संघातील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफसोबत यावर विशेष चर्चा घेतली आहे. खेळाडूंना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याचे सांगण्यात आले असून, इतर सामन्यांप्रमाणेच हा सामना देखील खेळण्याच्या दृष्टीने तयारी सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, खेळाडूंमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे.

या सर्व घडामोडींमध्ये भारताच्या सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांचं वक्तव्यही लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “या पार्श्वभूमीत भारत-पाकिस्तान सामना होईल असे वाटले नव्हते.” या वक्तव्यानंतर हा सामना अंतिम क्षणी रद्द होतो की खेळला जातो याबाबत नवीच शंका उपस्थित झाली आहे.

दरम्यान, एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे – यंदा भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. भारतीय प्रेक्षक मोठ्या संख्येने या सामन्याला विरोध करताना दिसत आहेत. हेच संकेत देतात की, सामान्य जनतेतही या सामन्यावर नाराजी आहे. अशा स्थितीत खेळाडू मैदानात उतरून पाकिस्तानला हरवतील की खऱ्या अर्थाने बहिष्कार घालतील हे काही तासांत स्पष्ट होईल.


Protected Content

Play sound