
सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने ‘एक्सप्लोरिंग सायकॉलॉजी’ या एकदिवसीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 13 रोजी झालेल्या या कार्यक्रमात मानसशास्त्रीय चाचण्या, प्रायोगिक उपकरणांचे प्रात्यक्षिक आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी भूषविले. त्यांनी उद्घाटन फित कापून केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानसशास्त्र हा विषय दैनंदिन जीवन जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट केले. आयटी क्षेत्र जितके आर्थिक लाभ देते, तितकेच मानसशास्त्र मानसिक समाधान देते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच महाविद्यालयात समुपदेशन केंद्र उभारून विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, अशी घोषणा केली.
मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सीमा बारी यांनी प्रास्ताविक करून उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. मानसशास्त्रीय प्रयोगांद्वारे व्यक्तीच्या भावना, धारणा, प्रेरणा व वर्तन यांचे मापन करून सामाजिक व भावनिक समस्या सोडविण्यास मदत होते, असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, डॉ. हरीश नेमाडे, प्रा. डॉ. आय. पी. ठाकूर, डॉ. सविता वाघमारे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. गोविंद मारतळे, डॉ. स्वप्नील शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले –
पदवी विभाग : प्रथम – दुर्गेश्वरी पंडित, द्वितीय – सानिका मेढे, तृतीय – चेतना पाटील
पदव्युत्तर विभाग : प्रथम – छाया शिरसाळे, द्वितीय – झीनत तडवी, तृतीय – रूपा अग्रवाल, उत्तेजनार्थ – हेमंत येवले
बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धीरज खैरे, झीनत तडवी व रूपा अग्रवाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन चेतना पाटील व रूपा अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशनसह मानसशास्त्रीय प्रयोगांना उत्साहाने प्रतिसाद दिला.



