Home राजकीय मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिंदेंना मोठा धक्का? १५ माजी नगरसेवक ठाकरेंकडे परतणार!

मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिंदेंना मोठा धक्का? १५ माजी नगरसेवक ठाकरेंकडे परतणार!

0
135

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हं आहेत. शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नवसंजीवनी मिळू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटात गेलेले तब्बल १५ माजी नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात येण्याच्या तयारीत आहेत.

राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता असून, त्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेची. या निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी ही बातमी अडचणीची ठरू शकते. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत संयुक्त शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले हे नगरसेवक नंतर शिंदे गटात सामील झाले होते. मात्र, निवडणुकीच्या काही महिने आधीच त्यांचा यू-टर्न शिंदेंच्या पक्षासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

ठाकरे गटामध्ये या माजी नगरसेवकांची पुन्हा भर पडली, तर उद्धव ठाकरे यांचे स्थान मुंबई महापालिकेच्या राजकारणात अधिक मजबूत होणार आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गट मनसेसोबत युतीसाठीही प्रयत्नशील आहे. अशा वेळी शिंदेंकडून आलेले नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे परतल्यास, हे सत्तासंघर्षाचे समीकरण पूर्णपणे बदलून टाकू शकते. हे नगरसेवक कोण आहेत याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी पक्षात त्यांचं पुनरागमन घडवून आणावं का, यावर ठाकरेंच्या बैठकीत चर्चा झाली.

१३ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील आगामी निवडणुकांसाठी रणनिती ठरवली गेली. यावेळी शिंदे गटात गेलेल्या ४६ माजी नगरसेवकांचा विषयही चर्चेला आला. त्यापैकी १५ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत यायला इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या नगरसेवकांना पुन्हा पक्षात सामावून घ्यायचं की नाही, यावर काही नेत्यांनी सावध भूमिका घेतली. यामुळे या प्रकरणावर पक्ष स्तरावर काय अंतिम निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound