यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात आणि हैद्राबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी आज यावल शहरात संतप्त माळी समाजाच्या वतीने जोरदार मोर्चा काढण्यात आला. श्री संत सावता महाराज समस्त माळी समाजाच्यावतीने आयोजित या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष सुभाष महाजन आणि उपाध्यक्ष दिनकर चौधरी यांनी केले. मोर्च्याचे स्वरूप शांततापूर्ण असले तरी, समाज बांधवांमध्ये प्रचंड असंतोष जाणवत होता.
मोर्चा यावल येथील खरेदी-विक्री संघाच्या आवारातून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत गेला. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. हातात फलक, मुखवटे आणि निषेधाचे बॅनर घेऊन त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मोर्चादरम्यान ओबीसी समाजाने एकमुखाने मागणी केली की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय हा मूळ ओबीसींवर अन्याय करणारा असून, तो तातडीने मागे घेण्यात यावा.

यावेळी नायब तहसीलदार बी. एम. पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, हैद्राबाद गॅझेटचा वापर करून जात नोंदींमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न ओबीसींच्या अधिकारांवर गदा आणणारा आहे. त्यामुळे तो रद्द करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मोर्चात सहभागी झालेले अनेक समाजबांधव विविध गावांमधून आले होते. त्यांनी सुद्धा या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. सरकारने निर्णय मागे घेतला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर मोठा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही काही प्रमुख समाजनेत्यांनी दिला.



