बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत गजानन महाराजांच्या पवित्र भूमीत, शेगावमध्ये येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेऊन हे स्नेहपूर्वक निमंत्रण दिले.
११ सप्टेंबर रोजी झालेल्या या भेटीत जाधव यांनी राष्ट्रपतींशी आयुर्वेद व पारंपरिक आरोग्यपद्धतींवर सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन आयुष मंत्रालयातर्फे करण्यात येत असून, यामागील उद्दिष्ट भारतीय पारंपरिक वैद्यकीय पद्धतींचा प्रचार आणि प्रसार, तसेच त्या पद्धतींमागील वैज्ञानिक आधार जनतेसमोर मांडणे हे आहे. शेगावमधील हा मेळावा आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी यांसारख्या भारतीय प्रणालींचा एक महत्त्वाचा व्यासपीठ ठरणार आहे.

राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्यात प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आयुष प्रणालींचे सादरीकरण, जनजागृती मोहिमा, निरोगी जीवनशैलीचा प्रसार, संशोधनासाठी मंच, औषधी वनस्पती उत्पादक व एमएसएमई क्षेत्रासाठी व्यावसायिक संधी, स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन, तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांत आयुषचा समन्वय, पर्यावरणपूरक आरोग्यसेवा आणि पारंपरिक ज्ञानाचे संवर्धन अशा विविध बाबींचा समावेश असणार आहे.
या ऐतिहासिक मेळाव्यासाठी बुलढाणा जिल्ह्याची निवड ही अत्यंत समर्पक असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले. त्यांनी नमूद केले की, “बुलढाणा ही राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन्मभूमी असून, संत गजानन महाराजांची समाधीभूमी, तसेच लोणार सरोवरासारखा जागतिक दर्जाचा नैसर्गिक वारसा लाभलेली भूमी आहे. अध्यात्म, परंपरा आणि विज्ञानाचा संगम असलेले हे स्थळ अशा महत्त्वाच्या आरोग्य सोहळ्यासाठी अत्यंत योग्य असून, राष्ट्रपतींच्या उपस्थितीने या सोहळ्याला अधिक प्रेरणादायी स्वरूप लाभेल.”
राष्ट्रीय स्तरावर आयोजित होत असलेल्या या मेळाव्यात विविध राज्यांतील आयुष तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी आणि शेतकरी सहभागी होणार असून, आयुष क्षेत्रात संशोधन, विकास आणि व्यावसायिक संधींना गती मिळणार आहे. या निमित्ताने शेगावसारखे धार्मिक आणि वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र राष्ट्रीय आरोग्यदृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे ठरणार आहे.



