मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडीमुळे रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी आता गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांना एनडीएच्या वतीने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी ही निवडणूक जिंकून उपराष्ट्रपतीपद पटकावले. त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात नवे राज्यपाल कोण असतील याची उत्सुकता वाढली होती. अखेर ही जबाबदारी आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आल्याने या चर्चेला विराम मिळाला आहे.

आचार्य देवव्रत हे शिक्षणतज्ज्ञ तसेच अनुभवी राजकीय व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांनी 2015 ते 2019 या कालावधीत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून कार्य केले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांची गुजरातच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. आता महाराष्ट्राचा कार्यभार देखील त्यांच्याकडे देण्यात आल्याने ते दोन राज्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत.
गुजरातसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आल्याने नवे राजकीय समीकरण आणि प्रशासनिक घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



