जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात २० ऑगस्ट रोजी शेतात घडलेल्या एका घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यात पती-पत्नी, त्यांची दोन मुले आणि सासू यांचा समावेश होता. तर दीड वर्षाची चिमुकली बचावली होती. या दुर्दैवी घटनेला आता एक महिना होत आला आहे. परंतू शासनाकडून अद्याप कोणतीही शासकीय मदत जाहीर झालेली नाही किंवा त्यांना मिळाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी बुधवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
यापूर्वीही या पीडित कुटुंबाने तीन वेळा प्रशासनाकडे मदतीसाठी संपर्क साधला होता, मात्र त्यांना अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद किंवा मदत मिळाली नाही. प्रशासनाच्या या उदासीन आणि वेळकाढू धोरणामुळे कुटुंबाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “प्रशासनाने आमच्या दुःखाची दखल घेतली नाही. आम्ही वारंवार मागणी करूनही केवळ आश्वासने मिळत आहेत, प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळत नाही,” असे कुटुंबीयांनी सांगितले. प्रशासनाच्या या ‘घोंगडी’ कारभारावर त्यांचा रोष दिसून आला.

मयत झालेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांनी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीनंतर तरी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागून पीडितांना न्याय मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



