जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या आधारवड आणि प्रेरणास्त्रोत असलेल्या श्रीमती गोदावरी पाटील यांचे ३ सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर संपूर्ण गोदावरी संस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या विविध महाविद्यालयांत शोकसभा आयोजित करण्यात आल्या. या शोकसभांमध्ये शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पदाधिकारी यांनी त्यांना कृतज्ञतेने वंदन केले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉ. केतकी पाटील हॉलमध्ये आयोजित शोकसभेसाठी वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. डॉ. आर्विकर यांनी श्लोकांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत गोदावरी आजींच्या कार्याचा गौरव केला. डॉ. सोळंके यांनी गोदावरी आजींच्या वैद्यकीय शिक्षण व सेवाप्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रमोद भिरूड यांनी गोदावरी आजींसोबतच्या आपल्या आठवणी शेअर करत भावनात्मक वातावरण निर्माण केले.

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी गोदावरी आईंच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा उल्लेख केला. या वेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्प अर्पण करून त्यांच्या प्रति आपली आदरांजली व्यक्त केली.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. या वेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आपली भावना व्यक्त केली.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय आणि रिसर्च सेंटरमध्ये डीन डॉ. हर्षल बोरोले यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी गोदावरी पाटील यांच्या समाजसेवेतील योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला. प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली.



