Home राजकीय  उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर ; युतीच्या चर्चेला उधाण

 उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर ; युतीच्या चर्चेला उधाण

0
132

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबईच्या राजकारणात आज पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांनी अचानक भेट दिली. या भेटीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संभाव्य युतीबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, ही दुसरी भेट काही दिवसांच्या आतच झाली आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे.

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमधील जवळीक हे महत्त्वाचे राजकीय संकेत मानले जात आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही पक्षांनी मिळून भूमिका घेतल्यानंतर ‘मराठी विजयी मेळावा’मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकाच मंचावर आले होते. या प्रसंगानंतरच युतीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना युतीबाबत बोलण्यास बंदी घातली होती, त्यामुळे ही चर्चा काहीशी थांबली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरेंनी मातोश्रीवर भेट देऊन मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर पोहोचले आणि सुमारे अडीच तास राज ठाकरेंच्या घरी थांबले होते. या भेटीचा राजकीय संदर्भ काय, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या बैठकीला मनसेचे नेते बाळा नांदगावकर हेही उपस्थित होते. यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक दृढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता सर्वांच्या नजरा दसरा मेळाव्याकडे वळल्या आहेत. उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी सूचक वक्तव्य करत, “दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र दिसतील, आणि तो मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ असेल,” असे म्हटले होते. त्यानंतर पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना विचारले की, राज ठाकरे दसरा मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील का? यावर राऊत म्हणाले की, “हे ठरवायचं काम उद्धव ठाकरे यांचं आहे. मी यावर भाष्य करणे योग्य नाही.”

ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीगाठी, सार्वजनिक व्यासपीठांवरील आपुलकी, आणि एकमेकांच्या निवासस्थानी होणाऱ्या वारंवार भेटींमुळे शिवसेना-मनसे युतीचं चित्र स्पष्ट होईल का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


Protected Content

Play sound