Home Cities पारोळा “चारित्र्य असेल तरच शिक्षणाचे खरे मूल्य” — कवी मनोहर आंधळे 

“चारित्र्य असेल तरच शिक्षणाचे खरे मूल्य” — कवी मनोहर आंधळे 

0
240

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “शिक्षणासोबत माणसाचे चारित्र्य चांगले असेल तरच त्या शिक्षणाला खरी किंमत मिळते; अन्यथा चारित्र्याविना शिक्षण निरर्थक ठरते,” असे स्पष्ट आणि प्रभावी विचार प्रसिद्ध कवी मनोहर आंधळे यांनी माध्यमिक विद्यालय तामसवाडी येथे आयोजित व्याख्यानात मांडले. त्यांच्या कवितांच्या सादरीकरणानेही उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली व व्याख्यानाला विशेष उर्जा प्राप्त झाली.

कै. आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात ना. शि. मंडळाच्या हायस्कूल तामसवाडी येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच हिरामण पवार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री डॉ. सतीशराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती रेखा पाटील, संचालक मुरलीधर वाणी, राजधर पाटील, अशोक पाटील, दिलीप महाजन, सुभाष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो चेअरमन, संचालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्हि. एस. बडगुजर यांनी कै. आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या कार्याचा उजाळा देत त्यांच्या समाजासाठीच्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर व्यासपीठावरून बोलताना माजी पालकमंत्री डॉ. सतीशराव पाटील यांनी सांगितले की, भास्करराव पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे तालुका सुजलाम-सुफलाम झाला. त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवून अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाची गंगा तालुक्यात आणली आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्न केले.

कवी मनोहर आंधळे यांनी आपल्या प्रभावी भाषणात शिक्षणाच्या खऱ्या मूल्यावर भर देताना विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, सद्वर्तन आणि चारित्र्य यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या कविता आणि सर्जनशील भाषेने वातावरण भारावून गेले. त्यांनी विद्यार्थ्यांना “आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणासोबत चांगल्या आचरणाची जोड द्या,” असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. डी. पाटील यांनी उत्साहपूर्वक केले, तर आभार प्रदर्शन संतोष बोरसे यांनी मानले. हा कार्यक्रम स्मृतिदिनानिमित्त केवळ श्रद्धांजली न राहता विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवणारा मार्गदर्शक क्षण ठरला.


Protected Content

Play sound