Home आरोग्य राष्ट्रीय पोषण सप्ताह गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये उत्साहात साजरा 

राष्ट्रीय पोषण सप्ताह गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये उत्साहात साजरा 

0
146

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभागातर्फे १ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. आरोग्यविषयक जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या सप्ताहात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून पोषणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यात “आजच्या तरुणांमध्ये पोषण जागरूकतेचा अभाव – जबाबदारी कोणाची?” या विषयावर विद्यार्थ्यांनी परखड मते मांडली. २ सप्टेंबर रोजी ‘हेल्दी क्विक ब्रेकफास्ट’ स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी, झटपट आणि पौष्टिक नाश्त्याचे पर्याय सादर करत सर्जनशीलतेचा उत्तम नमुना सादर केला.

३ सप्टेंबर रोजी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमाला भेट देऊन वृद्धांशी संवाद साधला, त्यांच्यासाठी पोषणावर आधारित माहिती सत्र घेतले आणि आरोग्य सल्लाही दिला. याच दिवशी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती, ज्यामध्ये “संतुलित आहार – निरोगी जीवनाचा पाया” या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी सृजनशील पोस्टर्स सादर केली. या उपक्रमातून पोषणाविषयी जनजागृतीसोबतच विद्यार्थ्यांचे विचार व कला देखील समोर आले.

सप्ताहाचा समारोप ८ सप्टेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभाने झाला. विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. प्राचार्य व अध्यापकांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सप्ताहातून केवळ पोषणाचे महत्त्वच नव्हे तर आरोग्यदायी जीवनशैलीविषयी जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये सादर करण्यासोबतच समाजाशी जोडलेपण अनुभवले. यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले.


Protected Content

Play sound