मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे मुक्ताईनगरकरांचे जीवन अक्षरशः नरक झाले आहे. शहरातील कचरा थेट पूर्णा नदीपात्राच्या बॅकवॉटरमध्ये खड्डा काढून गाडला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, शहरात दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि रोगराईचे संकट उभे राहिले आहे. या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
नगरपंचायतीच्या निष्क्रियतेवर संताप
एकीकडे ठेकेदार शहराला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लोटत असताना, दुसरीकडे नगरपंचायत प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. दरमहा लाखो रुपयांची बिले या ठेकेदाराला दिली जात आहेत, तरीही शहरातील रस्ते आणि गल्ल्या कचऱ्याने भरलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ ला आणि राज्य सरकारच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन’ ला नगरपंचायत प्रशासन तिलांजली देत असल्याची टीका नागरिक करत आहेत. हा ठेकेदार आपल्या मगरुरीमध्ये शहराचा सत्यानाश करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

राजकीय वरदहस्त आणि सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय
कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचा कारभार इतका बेजबाबदार झाला आहे की, स्थानिक लोकप्रतिनिधींनी विधानसभेत याविषयी तक्रारी केल्या होत्या. मात्र राजकीय वरदहस्त असल्यामुळे या ठेकेदाराची दादागिरी सुरूच आहे. त्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना घाणीचे आणि अस्वच्छतेचे चटके सहन करावे लागत आहेत. नागरिकांना यामुळे दूषित पाणीपुरवठा होत असून पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
आगामी निवडणुकीत मुद्दा तापण्याची चिन्हे
काही महिन्यांवर आलेल्या नगरपालिका निवडणुकीत हा कचऱ्याचा मुद्दा तापदायक ठरू शकतो. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्या या ठेकेदाराला आश्रय देणाऱ्यांना मुक्ताईनगरकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण आणखी गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे.



