जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या ११ दिवसांच्या भक्तीमय वातावरणानंतर जळगाव शहरात पारंपरिक मिरवणुकीसह गणेश विसर्जनाचा सोहळा उत्साहात पार पडत असून मानाच्या गणपती पूजनाने झाली विर्सजन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीला आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर ढेरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली. महापालिका, पोलिस प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांनी संयुक्तरीत्या विसर्जन मिरवणुकीसाठी सुरळीत आणि सुरक्षित व्यवस्था उभी केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजता मानाच्या गणपतींची मिरवणूक शिवतीर्थ मैदानावरून आरंभ झाला आहे. आरतीनंतर मिरवणुकीला सुरुवात झाली असून शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक पुढे सरकणार आहे. या मार्गांमध्ये कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, मनपा, शास्त्री टॉवर चौक, सानेगुरुजी चौक, भिलपुरा चौक, सराफ बाजार, पांडे चौक, सिंधी कॉलनी आणि शिरसोली नाका यांचा समावेश आहे.

वाहतुकीस अडथळा होऊ नये आणि मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन केले असून काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विसर्जनाच्या संचलनादरम्यान प्रत्येक गणेश मंडळास दोन गणरक्षक नेमण्यात आले असून, मिरवणुकीचा सुयोग्य समन्वय राखण्यासाठी हे गणरक्षक कार्यरत राहतील. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महापालिकेने आपत्कालीन कक्ष सुसज्ज ठेवला आहे.
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जयप्रकाश नारायण चौक (नटवर चौक) येथे एक वैद्यकीय सेवा केंद्र उभारण्यात आले असून, येथे १५ डॉक्टर, रुग्णवाहिका आणि औषधांची उपलब्धता असणार आहे. तसेच महिलांसाठी मार्गावरील हॉटेल्सची स्वच्छतागृहे खुली ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुरुषांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आहे.
महामंडळाच्या सूचनेनुसार, रात्री ८ वाजता संपूर्ण मिरवणूक मार्गावर एकाच वेळी महाआरती केली जाणार आहे. जेथे मंडळे त्यावेळी असतील, तेथेच आरती करून पुढील मार्गक्रमण सुरू करावे लागेल. विसर्जन प्रक्रियेत शिस्त राखण्यासाठी आणि पाण्यातील सुरक्षेसाठी १०० जीवरक्षक आणि १५ जलतरणपटूंची टीम सज्ज आहे.
महापालिकेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी मेहरुण तलाव परिसरात दोन ठिकाणी व्यापक व्यवस्था केली आहे. गणेश घाट येथे घरगुती आणि लहान मूर्तींसाठी ५ लाकडी तराफे, जीवरक्षक बोट आणि ४५ कर्मचाऱ्यांचे पथक असणार आहे. दुसरे ठिकाण सेंट टेरेसा हायस्कूलच्या पुढे असून, येथे ५ तराफे, ४ क्रेन, २ राखीव क्रेन आणि ४५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ सज्ज आहे. या संपूर्ण व्यवस्थेवर १३ अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
याशिवाय, पर्यावरण पूरक विसर्जनासाठी ७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये महानगरपालिका लाठी शाळा, पांझरा पोळ शाळा, सागर पार्क, पिंप्राळा शाळा, निमखेडी, नाभिक समाज सभागृह (शिवाजीनगर) आणि श्री साईबाबा मंदिर (मेहरुण) यांचा समावेश आहे.



