जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या घरगुती गॅसचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर, वाहने आणि अन्य साहित्य असा सुमारे ५.१६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी गॅस सिलिंडर साठवून त्याचा काळा बाजार करत आहेत व वाहने भरून त्याचे वितरण करत आहेत. माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह पोहेकॉ सलीम तडवी, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, रतन गिते व मयुर निकम यांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

या पथकाने तात्काळ दोन ठिकाणी छापा टाकून सदर कारवाई केली. छाप्यात गॅस सिलिंडर अवैधरित्या वाहनात भरताना आणि मोठ्या प्रमाणावर साठवलेले सिलिंडर आढळून आले. पोलिसांनी एकूण ५,१६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्यात गॅस हंडे, वाहने आणि इतर साहित्य समाविष्ट आहे, तो जप्त केला. या प्रकरणात अनिल शंकर सोनवणे (वय ४८, रा. बांभोरी, ता. धरणगाव) व मोईन शेख युसुफ शेख (रा. तांबापुरा, जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेमुळे यशस्वी ठरली असून, अवैध गॅस व्यवहारांना चाप बसविण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.



