जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक भान जपत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे उपक्रम वाढीस लागले आहेत. अशाच एका उपक्रमाअंतर्गत युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता गणेशमूर्ती विसर्जनानंतर नागरिकांना “सजीव बल्लाळेश्वर” गणपतीच्या रूपात तयार करण्यात आलेल्या रोपांचे प्रसाद स्वरूपात मोफत वाटप करण्यात येणार आहे.
काव्यरत्नावली चौक येथे मागील १७ वर्षांपासून या मंडळातर्फे गणेशोत्सवाचा आदर्श पद्धतीने आयोजन करण्यात येत असून, यंदाही याच परंपरेत वेगळेपण जपत गणेशमूर्तीची सजीव प्रतीकृती रोपांच्या सहाय्याने साकारण्यात आली आहे. या देखाव्यातून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या रोपांचे विसर्जन न करता त्यांचे पुढे संगोपन करता येईल, यामुळे गणेशोत्सव आणि पर्यावरणाचा सुंदर संगम साधण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत प्रत्येक परिवारास केवळ एकच रोप देण्यात येणार असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वानुसार वाटप होईल. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सकाळी १० वाजता उपस्थित राहून रोपांचा स्वीकार करावा आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे. या संकल्पनेतून केवळ उत्सव साजरा न होता, पर्यावरणाशी जोडलेली जबाबदारी देखील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.



